तब्बल १८ दिवसांनंतर सदावर्ते यांची सुटका

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (21:39 IST)
महाराष्ट्रभर तुरुंगावारी करणारे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल १८ दिवसांनंतर सदावर्ते यांची सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच, ही लढाई पुढे चालूच राहील, असं देखील सदावर्ते म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. त्यानंतर राज्यभरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांची महाराष्ट्रवारी सुरु झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूरपर्यंत गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला.
 
न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पुण्यातील विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मराठा समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती