निसर्ग वादळाच्या संकटानंतर वीज व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

शनिवार, 6 जून 2020 (06:43 IST)
कोरोना पाठोपाठ आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांसह अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका व नाशिक जिल्ह्याच्या काही भागात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीबरोबरच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून तो तातडीने सुरळीत करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
 
चक्रीवादळामुळे वीज वितरण व्यवस्थेच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाण्याच्या अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. नाशिक विभागाचे महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिज पाल जणवीर, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता श्री.सांगळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता डी.बी. गोसावी, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यावेळी उपस्थित होते. मंत्री बाळसाहेब थोरात यांनी निसर्ग वादळानंतर निर्माण झालेली परिस्थिती, विस्कळीत झालेली वीज व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्यासाठी करावयाच्या ठोस उपाययोजना याचा आढावा याप्रसंगी घेतला.  निसर्ग वादळानंतर उद्भवलेल्या विविध समस्यांवर श्री. थोरात यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
 
श्री.थोरात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट आले होते. शासन व प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपत्कालीन व्यवस्था चोख ठेवली होती. समुद्रकिनारी वसलेल्या अनेकांचे वेळीच स्थलांतर करण्यात आले. समुद्रातून भूपृष्ठावर आल्यानंतर निसर्ग वादळाचा वेग काहीसा कमी झाला. मात्र तरीही पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणार असून अनेक ठिकाणी खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी वीज वितरण विभागाने शिघ्रतेने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.
 
कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे असून कोरोना रोखण्यामध्ये शासनाला यश आले आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. पुढील काळातही प्रत्येकाने मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असून स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती