गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. पहिली ते बाराचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे”.
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवताराने राज्यात शिरकाव केला. त्यानंतर पाहता पाहता संसर्ग झपाट्याने वाढत गेला. त्यामुळेच राज्य सरकारने राज्यात कोरोना कडक निर्बंध लागू केले . त्यात शाळा बंद पासून ते खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीच्या निर्बंधाचाही समावेश आहे. मात्र, राज्यातील एकूण कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर गांभिर्याने चर्चा केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा महानगरांमध्ये आणि काही गावांमध्येच दिसून येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा स्थितीत ज्याठिकाणी प्रादुर्भाव आहे तेथेच निर्बंध कायम ठेवून अन्य ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याबाबत आजच्या बैठकीतच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.