सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

गुरूवार, 20 जानेवारी 2022 (14:03 IST)
राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार म्हणेजच 24 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. 
 
कोविड-19 आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. 
 
या निर्णयानंतरही अंतिम निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागात शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू केली जावी, असा प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. 
 
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. 
 
प्रस्तावात शाळा-महाविद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेजांमध्येच लसीकरण करण्याची आणि ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लशीची दुसरी मात्रा बाकी आहे, त्यांना ती देण्याची शिफारस केली आहे,' अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती