रेखा जरे हत्याकांड : जरेंची हत्या झाल्यानंतर बोठे कुठे होता ? धक्कादायक माहिती समोर !

बुधवार, 24 मार्च 2021 (16:18 IST)
रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
 
न्यायालयाने आरोपी बोठेच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतरही बाळ बोठे हा 3 ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान नगरलाच होता व या काळात तो नगरच्या रेल्वे स्थानकावरच फिरत होता व राहात होता, अशी नवी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.
 
दरम्यान, बोठेच्या पोलिस कोठडीत पारनेर न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. रेखा जरे यांची हत्या 30 नोव्हेंबर 2020 रोजी झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्या दोनच दिवसात पाच आरोपी पकडले होते व त्यांच्याकडील चौकशीत या खुनाचा सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे निष्पन्न झाल्यावर 3 डिसेंबरला पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसे पत्रकार परिषदेत जाहीरही केले होते.
 
या दिवसापासून बोठे गायब झाला होता व 102 दिवसांनी हैदराबादला सापडला. त्याला पकडल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. त्यावेळी त्याने 3 डिसेंबरपासून 10 डिसेंबर 2020 या दरम्यान नगरच्या रेल्वे स्थानकावरच राहिल्याचे व दिवसभर तेथेच फिरत होतो, असे सांगितल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले.
 
त्याने दिलेल्या या नव्या माहितीची खातरजमा पोलिसांकडून आता केली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून 3 ते 10 डिसेंबरदरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती