लातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी

बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:15 IST)
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर शहराला केल्या जाणार्‍या पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून माहे सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जाईल. शहराची पाण्याची गरज पुरवण्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यांयी पाणी पुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.
 
लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळित चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजनीचे पाणी टँकरने आणणे व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये १५ टक्के पाणी कपात करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महावितरण कंपनीने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी खंडित करु नये. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दयावे. तसेच तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवडयाला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती