बलात्कार पीडितेनी गर्भपात केला नाही म्हणून जातपंचायतीने कुटुंबाला टाकलं वाळीत

- प्रवीण ठाकरे
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची पोलिसांत तक्रार दाखल केली आणि गर्भपात केला नाही म्हणून तक्रारदार कुटुंबाला जातपंचायतीनं वाळीत टाकण्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात घडला आहे.
 
आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून दोनदा बलात्कार केला. त्यात ती गरोदर राहिली. पीडितेने मुलीला जन्म दिला आहे.
 
या प्रकरणात बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे, तर जातपंचायतीच्या 5 सदस्यांना अटक, करण्यात आली आहे. जयवंत श्रीपत सहाने (सोनवणे), ब्यानामी बाबरा सोनवणे, प्रदीप अशोक सोनवणे, पराशुराम माळी, ममता किशोर सोनवणे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.
 
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर 11 तासांनी आणि पाच तासांच्या पोलिसी कारभारानंतर पिंपळनेरमधील धोंगडे गावातील आदिवासी भिल्ल जातपंचायतीच्या 5 पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
पोलीस अधीक्षकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यास आदेश दिले की, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार जातपंचायतीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तिला धुळ्याच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.
 
पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी बीबीसीला सांगितलं की, "पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार आम्ही 5 लोकांविरुद्ध भा.दं.वि. कलम 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचं संरक्षण कायदा 2016 चे कलम 3(3),3(4),3(12), 3(15) व कलम 4,5 व 6 नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास चालू आहे."
 
काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धोंगडे गाव आहे. एकूण 12 पाडे वस्ती/गावठाण मिळून बनलेल्या धोंगडे गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीत मुख्यतः आदिवासी भिल्ल समाजाची लोकसंख्या जास्त आहे.
 
गावातल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून बाळा अब्राहम सहाणे या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
2018 च्या दिवाळीनंतर ह्या मुलीचे आईवडील ऊसतोडणीच्या कामासाठी गुजरातला गेले होते. जेव्हा ते मार्च महिन्यात परत आले तोपर्यंत मुलीचे पोट दिसू लागल्याने आई-वडिलांनी मुलीची विचारपूस केली असता प्रकार उघडकीस आला.
 
या प्रकारामुळे हादरलेल्या कुटुंबाने आरोपीच्या नातेवाईकांना घटना सांगितली असता त्यांनी सर्व प्रकार नाकारला. आरोपीनेही लग्नास साफ नकार दिला. गावच्या पंचायतीमार्फत आरोपीच्या कुटुंबाला बोलावण्यात आलं, पण ते आले नाहीत.
 
पंचायतीचं दबावतंत्र
गावानं मात्र या प्रकाराकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. गावातील काही लोकांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. या सर्व प्रकारामुळे त्रस्त कुटुंबाने पीडितेला नातेवाईकांकडे पाठवले. पिंपळनेर पोलीस ठाण्यात 21 मे रोजी आरोपीविरोधात तक्रार देण्यात आली.
 
आतापर्यंत एकही पोलीस तक्रार न करता पंचायतमध्ये तंटे सोडवणाऱ्या जातपंचायतीला हे खटकलं. पंचायतीने पीडित कुटुंबाला मुलीने "कुकर्म" केलं आणि बलात्कार करणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली म्हणून 11 हजार 51 रुपयांच्या दंडाचं फर्मान काढलं.
 
दळण-पाणी बंद
मुलीची आईच्या म्हणण्यानुसार, "गावातील लोक कधीही मुलीचा गर्भपात करतील म्हणून आम्ही गावाबाहेर राहण्याचा प्रयत्न केला, पोलिसांत तक्रार दिली म्हणून आम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागलं."
 
"आम्हाला जातपंचायतीच्या लोकांनी नुकताच दंड नाही केला, तर दंडासाठी तगादा ही लावला आणि दंड दिला नाही म्हणून गावात पाणी, किराणा आणि दळण बंद झालं, पिण्याचं पाणी आम्ही दूरवरून आणलं, आमच्या मुलीने मुलीला जन्म दिलाय. त्या आरोपी मुलाला आणि जातपंचायतीला ही योग्य ती शिक्षा व्हावी," पीडितेच्या आईने सांगितलं.
 
आम्ही पीडित मुलीची धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. तिला 31 तारखेला मुलगी झाली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, "आरोपीने तिला लग्नाचं आमिष दाखवत फसवलंय, तो लग्न करणार होता, मात्र जशी मी गर्भवती राहिले तो पळून गेला. आता त्याला शिक्षा झाली पाहिजे."
 
पीडितेच्या कुटुंबानं नवजात मुलीचा स्वीकार करून तिचं संगोपन करायचं ठरवलं आहे. सध्या पीडित कुटुंब पोलिसांच्या संरक्षणात आहे.
 
'कुटुंबाच्या आरोपात तथ्य नाही'
गावकऱ्यांनी मात्र कुटुंबाच्या आरोपात तथ्य नाही, असं म्हटलं आहे.
 
आम्ही गावात पोहोचलो तेव्हा धोंगडे गावी शांतता होती. पीडित कुटुंबाचं घर मुख्य गावठानासमोर आहे. घरकुल योजनेत मिळालेल्या घराला कडी होती. गावकऱ्यांपैकी कुणीही बोलायला तयार नव्हतं. आम्ही इतर ठिकाणी चौकशी केली असता गावचे काही लोक पोलीस स्टेशनला गेले असल्याचे कळलं.
 
पोलीस स्टेशनला आम्हाला 15 -20 गावकऱ्यांबरोबर शिमोन साने आणि पोलीस पाटील उखा वेडू पवार भेटले.
 
पोलीस पाटील जास्त काही बोलले नाही फक्त पीडित कुटुंब खोटे बोलतंय अशीच भूमिका त्यांनी मांडली.
 
तर शिमोन साने यांचे म्हणणे होते की, "आम्ही कोणतीही जातपंचायत वगैरे बसवली नाही, गावची बैठक मात्र होते, कुटुंबाकडे कोणताही दंड आम्ही मागितला नाही, उलट पीडितेचे वडील हे आमचे बाबा (नातेवाईक) असून आम्ही सदर प्रकार कळल्यानंतर मदत करायचा प्रयत्न केलाय. त्यांची इज्जत काय किंवा आमच्या गावाची इज्जत काय? आम्ही गावातील तंटे गावातच सोडवण्याचा प्रयत्न करतो."
 
शिमोन साने हे आरोपी बाळा सानेचे चुलत भाऊ आहेत. बाळा सानेला अटक झाली आहे. सध्या त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 
'न्यायासाठी गावकऱ्यांकडेच मदतीची याचना'
मार्च आणि एप्रिल महिन्यात हे कुटुंब गावात न्यायासाठी प्रयत्न करत होतं. पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तक्रार नोंदवली गेली नाही, असं पीडितेच्या कुटुंबांनी सांगितलं.
 
ज्या वेळी आमच्याकडे तक्रार आली तेव्हा आम्ही लगेच कारवाई केली, असं पोलिसांनी सांगितलं.
 
दरम्यान, त्यांची भेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्थानिक कार्यकर्ते नवल ठाकरे यांच्याशी झाली. ठाकरे यांनी थेट धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पीडित आणि कुटुंबाची कैफियत मांडली.
 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पिंपळनेर पोलीस स्टेशनला फोनवर आदेश दिल्यानंतर 21 मे रोजी पीडितेच्या तक्रारीनुसार पॉस्कोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
याविषयी पीडित कुटुंबीयांचे वकील विनोद बोरसे सांगतात, "अशा केसमध्ये तक्रार दाखल झाल्यांनंतर दुसऱ्या दिवशी सदर तक्रारीची प्रत न्याय सेवा विधी प्राधिकरणाकडे द्यायची असते, पण तसं झालं नाही. ही बाब आम्ही प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिली."
 
"लेखी आदेशानंतर 31 मे रोजी सदर प्रत पिंपळनेर पोलीस ठाण्यातर्फे प्राधिकरणाकडे देण्यात आली, या पोलीस दिरंगाईमुळे पीडित मुलीला दहा दिवस वैद्यकीय सहाय्य मिळण्यास उशीर झाला," बोरसे सांगतात.
 
'पोलिसांनी त्वरित कारवाई केली'
या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचं धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितलं.
 
आमच्याकडे जेव्हा तक्रार आली त्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात केली. आरोपी रुण तसंच जातपंचायतीच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे, असं पांढरे यांनी सांगितलं.
 
'प्रेम प्रकरणं करणाऱ्यांना दंड'
"आम्ही डिसेंबर महिन्यापासून गावात दारू पिणाऱ्याला 500 रु दंड तर गावातच प्रेम करणाऱ्या मुलामुलींना 11,051 रु दंड लावतो. मात्र पीडित कुटुंबाला कोणताही दंड आम्ही लावला नाही.
 
आमच्या वस्तीवर आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत, वावगे काही घडू नये म्हणून दंड घेतोय. ह्या प्रकरणात आम्ही कुणालाही वाळीत टाकलेलं नाही. याआधी आमचे कोणतेही प्रकरण पोलीस स्टेशनला गेले नाही," साने सांगत होते.
 
या प्रकरणात आरोपींची बाजू समजून घेण्यासाठी बीबीसीने आरोपींच्या वकिलांशी संपर्क साधला, पण आरोपींच्या वकिलांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती लगेच इथं मांडल जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती