अनेक शाळांना पावसाची सुटी

मंगळवार, 12 जुलै 2022 (11:33 IST)
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवल्याचं चित्र आहे. हवामान विभागाकडून सात जिल्ह्यात रेड अलर्ट तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
अतिवृष्टीमुळे नुकसान
अमरावती विभागात वीज पडून गेल्या 30 दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे हजारो घरांची पडझड झाली असून पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
 
नाशिकध्ये सप्तश्रृंगी गड येथे अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात 7 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
 
पालघरमध्ये जव्हार, मोखाडा या दुर्गम भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. जव्हार तालुक्यात वांगणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
 
शाळा बंद
नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे तूर्तास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नाशिकमध्ये 11 जुलैपासून पहिली ते बारावीच्या शाळा बंद आहेत.
 
नाशिक आणि आसपासच्या परिसरातील धरणांचा साठा वाढला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणाचा पाणीसाठा सध्या 66% आहे तर धरणातून 10075 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणा धरणात 70% पाणीसाठी असून1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
 
इतर काही धरणांचाही पाणीसाठा पाहूया, ओझरखेड 97%, मुकणे 60%, भावली 74 %, वालदेवी 66%, वाघाड 96%, तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 72717 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
 
मुंबईत सलग तीन दिवस पाऊस
मुंबई उपनगर आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सायन, माटुंगा, अंधेरी, कुर्ला अशा ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. तसंच पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.
 
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे सुरू आहेत मात्र पावसाचं पाणी आणि ट्रॅ्कवरील कचरा यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत.
 
मुंबईत आजपासून (12 जुलै) पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सलग तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
 
गडचिरोलीत पूरपरिस्थिती
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (11 जुलै) गडचिरोलीत जाऊन या भागाची हवाई पाहणी केली.
 
या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नागपुरात आलो असता, विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण केले."
 
उत्तर महाराष्ट्रातही पावसानं धुमाकूळ घातला आहे.
 
नाशिकमध्ये पुढील 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नाशिकमधील एकूण सहा धरणांमधून 50 हजार क्युसेक्सनं जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे.
 
नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती