राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. वातावरणातील या असमतोल स्थितीमुळे शेती पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दरम्यान, आज आणि उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून थंडीचा प्रभावही कमी होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दोन दिवसांपासून थंडी गायब झाली असून उकाडा सुरू झाला आहे. आज आणि उद्या राज्यातील १७ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने वातावरणात बदल झाला असल्याचं सांगण्यात येतंय. मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ७ अशा १७ जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली. ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे थंडीचा प्रभाव कमी होणार असून मुंबई, कोकण आणि विदर्भात थंडी कायम राहणार आहे.
अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मात्र, २९ जानेवारीनंतर पुन्हा तापमानात घट हऊन थंडीचा जोर राज्यभरात वाढण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे.