सकाळी कुर्ला, सांताक्रूज, कुलाबा, बोरिवली, कांदिवली, बदलापूर, पनवेल, शहापूर, नवी मुंबई सर्वत्र पावसाचा जोर दिसून आला. पावसामुळे सायन, हिंदमाता सिनेमा येथे पाणी तुंबले त्यानंतर येथील वाहतूकही वळवण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबईमध्ये पाऊस येण्यास उशीर झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या तलावक्षेत्रांमध्ये पाऊस न झाल्याने या तलावांवधील, धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. पाऊस असाच लांबल्यास मुंबई-ठाण्यावर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता होती. मात्र आता ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.
आज झालेल्या या पावसाबद्दल बोलताना भारतीय हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, "वायू चक्रीवादळामुळे मान्सून दाखल व्हायला उशीर झाला आहे. जून संपत आला तरी मान्सून दाखल न होण्याची ही गेल्या अनेक वर्षातील ही एक दुर्मिळ घटना आहे. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल."
अंधेरीत सकाळी साडेअकरापर्यंत 81 मिमी पाऊस
सकाळी साडेअकरापर्यंत बोरिवली येथे 54 मिमी, पवई येथे 68 मिमी, अंधेरीमध्ये 81 मिमी, सांताक्रुजमध्ये 62 मिमी, बीकेसीमध्ये 35 मिमी, मरिनलाइन्स येथे 83 मिमी, विक्रोळीमध्ये 53 मिमी पाऊस पडला. हा पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे त्यात वाढ होईल अशी माहिती पालावत यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.