कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग

मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (08:02 IST)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग जमा झाले आहे. त्यामुळे या पट्ट्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातही अशीच परिस्थिती असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी १२ व १३ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. १२ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये तर १३ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हे दोन दिवस पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रात घाट असलेल्या भागात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पालसाची शक्यता असून किनारी भागातदेखील सोसाट्याचा वारा वाहत राहील.
 
कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील चार – पाच दिवस मन्सून महाराष्ट्रात सक्रीय राहणार असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यचे हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे.
 
येत्या १४ आणि १५ सप्टेंबर रोजीही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अचानक अतिशय जोरदार आणि ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच आता पुन्हा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती