मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, गोरेगाव असा मेगाब्लॉक रविवारी घेण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४७ वाजल्यापासून ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ब्लॉक काळात मुलुंड ते कल्याण लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच या लोकलला ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या कालावधीत कल्याण स्थानकावरील कसारा दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर ७ तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या रात्रकालीन ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावरील पायाभूत कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल मार्गादरम्यान जलद मार्गावरून लोकल चालविण्यात येतील. त्यामुळे माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकलला थांबा दिला जाणार नाही.
तर, मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ मार्गावर विरार दिशेकडे जाणाºया लोकलला महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबा नसेल. लोअर परळ, माहिम, खार रोड स्थानकांवर लोकलला दोनदा थांबा दिला जाईल.