रायगड :मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे अनधिकृत विदेशी दारू जप्त

मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:11 IST)
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ( जि. रायगड ) येथे लाखो रुपये किमतीची विदेशी दारू विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या दोघा इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वाहनासह जेरबंद करण्यात यश आले आहे.
 
रविवारी (दि.२३) एलसीबीचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे, मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड येथुन विदेशी दारू विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालीत असताना एक टेम्पो अडविण्यात आला.टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीर विदेशी दारूच्या खोक्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.अधिक चौकशी केल्यानंतर वाहतुक करणाऱ्या इसमास वाहनासह ताब्यात घेण्यात आल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली व त्यानंतर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी महेश श्रीकृष्ण सूर्यवंशी (वय-२४) रा.चिंचोळे आवार-नाशिक, अनिल मोतीराम गायकवाड (वय-३६) रा.वडोदरा-गुजरात यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७० हजार रु. किंमतीची विदेशी बनावटीची रॉयल ब्लू व्हिस्कीच्या दारूचे एकुण ११०० बॉक्स, १६ लाख रु. किंमतीचा भारत बेन्झ कंपनीचा ट्रक असा एकुण २३ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस नाईक अक्षय जाधव, पोलीस शिपाई अक्षय सावंत व सायबरचे पोलीस शिपाई अक्षय पाटील या पथकाने केली .

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती