भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेले महाराष्ट्रातील जवान राहुल पाटील शहीद

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (08:33 IST)
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जवान राहुल लहू पाटील (वय-30) यांना पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना विरमण आले. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. एरंडोल येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत.
 
शहीद राहुल पाटील हे पंजाबमधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थामध्ये परिवारासोबत वास्तव्यास होते. तेथून 20 किमी अंतरावर भारत-पाकिस्तान सीमा आहे. या सीमेवर राहुल पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांना विरमरण आले. त्यांचे पार्थिव पंजाबहून मुंबई व तेथून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या मुळगावी आणले जाणार आहे. राहुल पाटील हे शहीद झाल्याची बातमी एरंडोलमध्ये पसरताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
 
जळगाव जिल्ह्याने 2 महिन्यात 4 जवान गमावले
मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान शहीद झाले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या शीघ्र कृती दलावर केलेल्या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 21 वर्षीय यश दिगंबर देशमुख यांना विरमरण आले. त्यानंतर पुंच्छ मध्ये बर्फवृष्टीत जखमी झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील 33 वर्षीय अमित साहेबराव पाटील यांना 16 सप्टेंबरला  विरमरण आले. याच तालुक्यातील तांबोळे येथील 23 वर्षीय जवान मणिपूरमध्ये तैनात असताना झालेल्या गोळीबारात शहीद झाले. आणि आज राहुल पाटील यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्याने चौथा जवान गमावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती