महायुती सरकारवर जे विरोधक बोलत आहेत, त्यांनी आणलेला प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत", असा पलटवार मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाने विधानसभेत आज 293 नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर युती सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली होती. त्याला शेलारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
"हा प्रस्ताव म्हणजे आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पत्रकार निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा विषय काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण विचारतेय? ज्यांनी पत्रकार राहुल कुलकर्णी याने ठाकरे सरकार विरोधात बातमी दिली म्हणून त्याला कोरोना काळात फरफटत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले ते आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत? निखिल वागळे यांच्या बाबतीत जे घडले त्याची तक्रार दाखल झाली आहे पोलीस पुढील कारवाई करतील. पण एक निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला घरात घुसून डोळा फोडला, केतकी चितळे हिच्यावर कुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला? त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये. मुंबईत ज्यांनी बिल्डरांना 12 हजार कोटी रुपयांची प्रिमियम माफी दिली त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली तेच उबाठा आज मुंबईत प्रदुषण वाढले म्हणून बोंबाबोंब करीत आहेत", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.