नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू; तुरुंगरक्षकावर मारहाणीचा आरोप

मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (08:06 IST)
नागपूर : मोक्का प्रकरणात कारागृहात असलेल्या कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून कैद्यांनी गोंधळ घातला आहे. याबाबत काही कैद्यांनी तुरुंगरक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे या कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तुरुंग अधिकाऱ्याला घेराव घातल्याची देखील सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ तायवाडे (वय 24 वर्षे, रा.पाचपावली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर पाचपावली ठाण्यातील मोक्काचा आरोपी आहे. शुक्रवारी (दि. 9) सकाळी सौरभच्या छातीत दुखत असल्याचे त्यांनी तुरुंगरक्षकाला सांगितले होते. परंतु तुरुंगरक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सौरभ जेवणाच्या रांगेत उभा असताना देखील त्याने तुरुंगरक्षकाला त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देत, दवाखान्यात नेण्यासाठी सांगितले होते. परंतु रक्षकाने त्याला कानाखाली चापट मारली. यामुळे तो खाली पडला आणि त्याची प्रकृती अधिकच बिघडली. दरम्यान शुक्रवारी सौरभला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू झाला. ही बातमी कारागृहामधील कैद्यांन कळताच 70 ते 80 कैद्यांनी याबाबत रोष व्यक्त करत तुरुंग अधिकारी कुमरे यांना घेराव घातला.
 
याशिवाय कारागृह रक्षकाने मारहाण करुन दिरंगाई केल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बराकीत न जाण्याची धमकीही इतर कैद्यांनी दिली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. कुमरे यांनी धंतोली पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांचा ताफा कारागृहात दाखल झाला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला होता. त्यानंतर कैदी आपापल्या बराकीत गेले. या घटनेची माहिती काराागृह प्रशासनाने सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर यासंदर्भात माहिती समोर आली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती