विकासासाठी जर काही जण तिकडे गेले असतील, तर शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही? शेतकऱ्यांचा कांदा एक रुपयाला जातोय, तो शेतकरी ढसाढसा रडत होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आता बघवत नाही, असं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितले. शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश मांडला.
शेतकरी त्याच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करणार? महाराष्ट्रात ही सर्व परिस्थिती दडपशाहीची आहे. आपले सरकार आल्यावर सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्त्वांवर चालेल. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या व माझ्या महाराष्ट्राचा,आपले सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल, असं आश्वासन देखील सुप्रिया सुळेंनी दिलं.
ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्ष फोडायचे पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही. आपल्याला या ब्रिटिश सरकार विरोधात लढायचे आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.