प्रकाश आमटे यांना रक्ताचा कर्करोग… काय आहे ल्युकेमिया कॅन्सर ?

बुधवार, 15 जून 2022 (07:48 IST)
ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे  यांना रक्ताच्या कर्करोगाचे  निदान झाले आहे. त्यांच्यावर पुणे  येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. प्रकाश आमटे यांना दुर्मिळ असा हेअरी सेल ल्युकेमिया  हा रक्ताचा कर्करोग झाल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आमटे यांची प्रकृती सुधारण्यासाठी अनेक लोक प्रार्थना करत आहेत.
 
प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र आहे. ते डिसेंबर १९७३ पासून पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली  जिल्ह्यातील भामरागड  तालुक्यातील हेमलकसा  येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून ते स्थानिक आदिवासी लोकांची सेवा करत आहे. तसेच इथल्या लोकांसाठी दवाखाना चालवतात. तसेच लोकांनी आणलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना २००२ मध्ये भारत सरकारने पद्मश्री  पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांच्या या कार्याची दाखल जागतिक पातळीवर देखील घेण्यात आली आहे. २००८ साली त्यांना पत्नी मंदाकिनी यांच्यासह रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
 
काय आहे ल्युकेमिया… ल्युकेमिया हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार आहे. या आजारात शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. या कॅन्सरच्या पेशी अस्थिमज्जामध्ये वाढतात आणि शरीरात ज्या निरोगी रक्तपेशी आहे, त्यांची वाढ रोखण्यासाठी अस्थिमज्जामध्ये राहतात. यावर वेळीच उपचार न केल्यास ते जीवघेणे देखील ठरू शकते. या प्रकारच्या कॅन्सर मध्ये कॅन्सर पेशी प्रथम बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा व रक्त यांच्यात निर्माण होतात. नंतर या पेशी यकृत, लसिका ग्रंथी, वृषण या व इतर अवयवांत पसरतात. अस्थिमज्जा हा अस्थींमधील आतील मृदू भाग असून त्यात प्रामुख्याने स्टेम सेल्स व परिपक्व अशा रक्त निर्माण करणाऱ्या पेशी असतात. सुरुवातीला वाढीच्या काळात या पेशी अनेक अवस्थांतून जाऊन विकसित होतात. त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी व प्लेटलेट्सची निर्मिती करतात. याच प्रक्रियेत विकृती आल्यास कॅन्सरग्रस्त रक्तपेशी निर्माण होतात व ल्युकेमिया निर्माण होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती