कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, राज्य सरकारचं पाऊल

बुधवार, 30 मार्च 2022 (09:15 IST)
दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बक्षीस मिळणार आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर 14 वर्षांनी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.
 
अजमल कसाबला धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2020 मध्ये घेतला होता. या निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.
 
या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजे 2020 साली कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
 
वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजे हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार असेल तेवढा पगार मिळणार आहे. राज्य सरकारकडून 15 जणांना हे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती