भोंग्यांवरुन नाशिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:34 IST)
नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शहर पोलिसांनी नोटिस बजावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याची दखल नाशिक शहर पोलिसांनी घेतली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज म्हणाले होते की, मशिदींवरील भोंगे हे बंद करायला हवेत. यासंदर्भात उच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. हे भोंगे काढले नाहीत तर मशिंदींसमोर हनुमान चालिसाचे स्पीकर मोठ्याने लावले जातील, असे राज यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मुंबईत काही ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालिसाचे भोंगे लावले. नाशकातही अशा पद्धतीने भोंगे लावले जाण्याची शक्यता आहे. यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचीच दखल घेत अंबड पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर संघटक अर्जुन वेताळ, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, मनविसे शहराध्यक्ष संदेश जगताप आदींना नोटीस बजावली आहे. शहराच्या कुठल्याही भागात अशा प्रकारे भोंगे लावू नयेत. ते लावण्याच आले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती