Wardha News : वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेक जंगलात महिलेचा सांगाडा सापडला आहे. तसेच सांगाड्याजवळ साडी, बांगड्या व इतर दागिने सापडले. महिलेचा खून झाल्याचा संशय बळावला. तब्बल दोन महिन्यांनंतर पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 8 नोव्हेंबरला खेकच्या जंगलात हाडांची रचना आणि कवटी सापडली होती. याची माहिती गावातील काही नागरिकांनी गिरड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. घटनास्थळावरून मानवी सांगाड्याजवळ साडी, एक स्कार्फ, पांढरा पेटीकोट, दोन चांदीच्या अंगठ्या, एक पायल, कानातले आणि इतर काही वस्तू सापडल्या. डग स्कॉड, फिंगरप्रिंट तज्ञ यांनी तपास केला. गिरड पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त करून पुढील तपास सुरू केला. तसेच तपासादरम्यान २० सप्टेंबर रोजी वडनेर पोलिस ठाण्यात महिलेच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदार नंदकिशोर मोतीराम सावळे यांना बोलावून साहित्य दाखविण्यात आले. कपडे, दागिने, वैद्यकीय बेल्ट आणि इतर गोष्टींच्या आधारे मृत महिलेचे नाव गीता असून ती मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील रहिवासी होती. गेल्या काही वर्षांपासून त्या दरोडा येथे पती नंद किशोरसोबत राहत होत्या. आरोपी सुरेश बावणे आणि मृतकामध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. घटनेच्या दिवशी दोघेही एकत्र असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. त्याआधारे गिरड पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतले. त्यानंतर या हत्येचे गूढ उकलले.