महाराष्ट्रात शिंदे अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे ही जाहिरात काही वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्त लोकप्रियता मिळाल्याचं समोर आलं होतं. भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने कौल दिला. त्यामुळे या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अलबेल नसल्याची चर्चा सुरू होती. त्यावरून आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले. परंतु या जाहिरातीमागचा मुख्य मास्टरमाईंड कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी बुद्धीच्या लोकांनी ती जाहीरात दिली, असं म्हणत जाहिरात देणाऱ्यांना टोला लगावला.
कमी बुद्धीच्या लोकांनी ती जाहीरात दिली
देवेंद्र फडणवीसांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. त्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक पक्षात काही कमी बुद्धीची लोकं असतात. काही लोकं मनोरुग्ण असतात. त्यामुळे मला असं वाटतंय की, कुठल्यातरी एका व्यक्तीने ही गोष्ट केली असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते आहेत. जर ते लोकप्रिय आहेत तर आमचे सरकार लोकप्रिय आहे. त्यामुळे मला वाईट वाटून घ्यायचं काहीही कारण नाही. ज्याप्रकारे जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये पूर्णपणे मुर्खता होती. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची चूक मान्य केली. त्यांनी मला फोन केला होता की, त्यांच्या लोकांनी ही चूकी केली आहे. माझ्यासाठी हे योग्य नव्हतं. परंतु त्यांनी सांगितल्यानंतर माझा विषय तिथेच संपला होता. आमच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना राग अनावर होतो. एकप्रकारे आमच्या नेत्यांमध्येही नाराजी होती. परंतु ती नाराजी दूर झाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.