उलवे, सेक्टर १२, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी योवेळी सांगितले.