पंकजा मुंडे यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका, सांगितले रस्त्यावर उतरून आवाज उठवूं

मंगळवार, 25 जानेवारी 2022 (21:01 IST)
बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
 
आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. तसेच, “आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं.” असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
 
याचबरोबर, “सत्ता ही कुणाच्या ताब्यात द्यायची आणि कुणाच्या ताब्यात द्यायची नाही, हे जनतेला आता कळलेलं आहे. म्हणून आताचे हे निकाल आहेत. आता जे निकाल लागले हा पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांचा विजय नाही हा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. तर, सत्ताधाऱ्यांचा पराभव आहे. हा जनतेने दिलेला कल आहे. आम्ही आगामी काळातील निवडणुका देखील जिंकणार आहोत, ही विजयाची मुहूर्तमेढ आहे. आगामी विधानसभेत परत पहिल्यासारखा निकाल लागणार आहे, लोकसभेत परत पहिल्यासारखा निकाल लागणार आहे कारण जनता आमच्या पाठीशी आहे. केजमध्ये नगराध्यक्ष आमचाच होणार.” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
 
तसेच, “काम करत असताना कधी भेदभाव करायचा नाही, किती योजना आणल्या? आपल्या जिल्ह्याला आपला पालकमंत्री काय देतो हा हिशोब करायची बीड जिल्ह्याला सवय नाही. आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याला काय देतो? देशाला काय देतो? हा अभ्यास करायची बीड जिल्ह्याला सवय आहे. तुम्ही कधी पदर पसरून काही मागून आणण्याची गरज बीड जिल्ह्याला भासलीच नाही.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती