'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलेलं पण मी पायलटला सांगितलं...' - शरद पवार

गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (10:26 IST)
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
रावत यांच्या निधनाबद्दल देशभरातून दुःख व्यक्त केले जात असून सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
या प्रवासाचा अनुभव सांगताना शरद पवार म्हणाले, 'माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.
 
'त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.'
 
'आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे.
 
'ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो,' असं पवार यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती