समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांनी वाशिम सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी वाशिम सेशन कोर्टाने नवाब मलिकां विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाली
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बनाव रचला होता, असा आरोप करत नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले होते. समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. तसेच नवाब मलिकांनी जातीसंदर्भात कादगपत्रे समोर आणत समीर वानखेडेंनी खोटी कागदपत्रे सादर केली आणि सरकारी नोकरी मिळवली, असा गंभीर आरोप केला होता. नवाब मलिकांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांनी याचिका दाखल केली होती. समीर वानखेडे यांच्या तक्रारीनुसार वाशिम सेशन कोर्टाने वाशिम पोलिसांना नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.