रत्नागिरी जिल्ह्यात औषधे दुकान वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश

सोमवार, 19 एप्रिल 2021 (16:19 IST)
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत जात असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्ह्यात औषधे दुकान वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच कोविड 19 च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांची तात्काळ कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शहरात महत्वाच्या तीन ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच मोबाईल पथकही कार्यरत आहे. रेल्वे स्टेशन येथेही कोविड पथक नेमण्यात आले आहे.
 
राज्यातून  रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 72 तासांपूर्वीचे RT- PCR Test बंधनकारक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काल 515 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापलेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15075 वर पोहोचली आहे. काल 167 कोरोनाचे रुग्ण बरे झाले. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेने कोविड-19च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. 
 
कोकण रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची देखील तपासणी करुन कोराेना टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच अनेक जण मोठ्या प्रमाणावर खासगी गाड्या घेऊन कोकणात दाखल होत असल्याने  आता प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर तपासणी केंद्रे सुरु केली आहेत. मुंबईतून येणारे चाकरमानी कशेडी घाटामधून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याने त्या ठिकाणीदेखील  कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती