आमदार जितेंद्र आव्हाडांना मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना दिले आहेत. मंगळवारी या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीपर्यंत जितेंद्र आव्हाडांना अटक करु नये असे आदेश न्यायलयाने दिले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कार्यक्रमात एका महिलेला धक्का देऊन दूर केल्यामुळे ठाण्यातील मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाडांना राजीनामा देऊ नये अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आव्हाड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही म्हणत पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड काहीसे भावूक झाल्याचे दिसले.