जे शरद पवारांना घरी बसा बोलले तेच त्यांना भेटायला आले यातच सर्व आलं – जयंत पाटील

मंगळवार, 18 जुलै 2023 (07:27 IST)
अजित पवार तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला पोहचले. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या गटाचे सर्व आमदार होते.या बैठकीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. पक्ष एकसंध राहावा या दिशेनं शरद पवारांनी प्रयत्न करावा, अशी विनंती केली आहे."
 
याआधी अजित पवार आणि समर्थक आमदारांनी काल 16 जुलै रोजी शरद पवारांची भेट घेतली होती.
 
जयंत पाटील यांचा अजित पवार यांना टोला
दरम्यान या भेटीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
 
“आलेल्या आमदारांनी शरद पवारांना यातून मार्ग काढण्याची विनंती केली,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं. “या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हीच उपाय सुचवा,” असं शरद पवार या आमदारांना म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
 
शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
 
संवाद बंद केल्यानं नुकसान होतं त्यामुळे संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
 
तसंच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार सोडून सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
 
“जे पवारांना घरी बसा बोलले तेच त्यांना भेटायला आले यातच सर्व आलं,” असा टोलासुद्धा यावेळी पाटील यांनी हाणला आहे.
 
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात येणं टाळलं. त्यामुळे कोणाच्या गटात किती आमदार याबाबत पहिल्या दिवशी संभ्रम कायम राहिला.
 
यापूर्वी मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनी 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला पण प्रत्यक्षात अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही.
 
काल अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर आज अनेक आमदार अनुपस्थित होते. नेहमी पक्षाची बाजू मांडणारे जितेंद्र आव्हाडांसारखे आमदारसुद्धा आले नाहीत. त्यामुळे ही अनुपस्थिती नेमकं काय दर्शवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
दोन्ही गटांकडून खालील आमदार सभागृहात उपस्थित होते.
 
शरद पवार समर्थक आमदार
जयंत पाटील
अनिल देशमुख
बाळासाहेब पाटील
सुनील भूसारा
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे
सुमन पाटील
रोहीत पवार
मानसिंग नाईक
अजित पवार समर्थक आमदार
शपथ घेतलेले नऊ मंत्री आणि
बबन शिंदे
इंद्रनील नाईक
प्रकाश सोळंके
किरण लहमाते
सुनील शेळके
सरोज अहिरे
अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. यामुळे गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आता उपमुख्यमंत्री झाल्याने विधानसभेतलं चित्र बदललेलं दिसेल.
 
2 जुलै रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. तर 14 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप झालं आणि अजित पवार यांना अर्थखातं मिळालं.
 
खरं तर शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांचा विरोध होता असं वृत्त समोर आलं होतं. पण तरीही अर्थ खात्यासह महत्त्वाची खाती आपल्याकडे मिळवण्यात अजित पवार यांना यश आलं.
 
तसंच शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आणि अजित पवार गटाला मोठी खाती मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचं युती सरकारमधलं महत्त्व कमी झाल्याची चर्चाही गेल्या दिवसांत सुरू झाली.
 
यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी तीन पक्षात कसा समन्वय दिसतो की कुरघोडीचं राजकारण पहायला मिळणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची संधी असताना ऐन अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सामील झाला. यामुळे विरोधकांचं संख्याबळ कमी झालं असून सत्ताधा-यांना धारेवर धरण्याचं एक मोठं आव्हान विरोधकांसमोर आहे.
 
आतापर्यंत विधिमंडळात विरोधकांचं नेतृत्त्व अजित पवार करत होते. त्यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे असे नेते आक्रमकपणे विरोधकांची बाजू मांडत होते. पण विरोधकांचा आवाज असलेले हे नेतेच सत्तेत गेल्याने महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.
 
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (16 जुलै) दुपारी साधारण 1 वाजता अजित पवार आपल्या 8 मंत्र्यांसह अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. 2 जुलै रोजी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेत सहभागी झालेले मंत्री आणि शरद पवार यांच्यातील ही पहिलीच भेट होती.
 
ही भेट सुरू असतानाच विधिमंडळात विरोधी पक्षांची बैठक सुरू होती. या बैठकीतून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनाही तातडीने बोलवण्यात आलं.
 
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे असताना अचानक झालेल्या भेटीमुळे एकच खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आलं.
 
या भेटीमध्ये शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून झाला. तर शरद पवार यांचा आशीर्वाद घेतला असंही गटाकडून सांगण्यात आलं.
 
पक्ष एकसंघ रहावा यासाठी शरद पवार यांच्याकडे विनंती केली अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. तर यासंदर्भात शरद पवार यांनी भेटीदरम्यान कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
 
परंतु शरद पवार यांनी मात्र या प्रस्तावावर अद्याप कुठलंही भाष्य केलेलं नाही. तर अजित पवार यांनी ही भेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं सांगितलं.
 


Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती