ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती मूकबधिर नेमबाज प्रियेशा देशमुखला राज्य सरकारकडून दुर्लक्ष कोणतेही पारितोषिक आणि सत्कार नाही
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (08:02 IST)
नियमित ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणेच विशेष तथा दिव्यांग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात येतात, या स्पर्धेत मूळची नाशिकची कर्णबधीर दिसले डिस्लेक्सियाग्रस्त खेळाडू कु. प्रियेशा शरद देशमुख हिने नेमबाजी स्पर्धेत आपल्या देशाला म्हणजेच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, परंतु राज्य शासनाने तिच्या या सुवर्ण कामगिरीची साधी दखल सुद्धा घेतली नाही. त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने असो की, विद्यमान शिंदे-फडणवीस यांचे सरकार या दोन्ही सरकारांनी तिच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण कामगिरी बद्दल कोणतीही बक्षीस दिले नाही इतकेच नव्हे तिचा साधा सत्कार सुद्धा केला नाही. दक्षिण आफ्रिकेत ब्राझील देशात यावर्षी सुमारे चार महिन्यापूर्वी मे मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर डेफ ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी केली होती.
मुळची नाशिकची रहिवासी कु. प्रियेशा शरद देशमुख हिने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरी स्पर्धेत रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या कामगिरीची दखल घेत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला नवी दिल्ली येथे खास निमंत्रित करून संवाद साधत कौतुक केले होते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारकडून देखील तिच्या या सुवर्ण कामगिरीचे कौतुक व्हावे म्हणून राज्याच्या शिक्षण, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधला होता. तसेच तत्कालीन क्रीडामंत्री यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली होती, परंतु राज्य शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
दरम्यानच्या काळात या स्पर्धेला चार महिने उलटले. आता राज्यात सत्तांतर झाले, या संदर्भात पुन्हा मुंबईत पत्रव्यवहार करण्यात आला मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले, परंतु अद्याप प्रियेशाच्या कामगिरीची राज्य शासनाकडून साधी दखल देखील घेण्यात आली नाही, प्रियेशा सध्या पुणे येथे पुढील शिक्षण घेत असून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने नुकताच खास समारंभ आयोजित करून तिचा सत्कार करीत सुवर्ण कामगिरीची कौतुक केले आहे.
प्रियेशाच्या कामगिरीबद्दल माहिती देताना तिचे वडील व आरटीओ कार्यालयातील अधिकारी शरद देशमुख यांनी सांगितले की, प्रियेशाला जन्मापासूनच कर्णबधीरतेचा विकार असून तीला डिस्लेक्सियाचा देखील आजार आहे, यामुळे तिला लिहिणे वाचणे शक्य होत नाही, परंतु अनेक अडचणीवर मात करीत शिक्षण घेताना तिला शाळेत असताना नेमबाजी तथा शूटिंगची आवड लागली, त्यामुळे आम्ही तिला प्रशिक्षण शिबिरात दाखल केले.
प्रचंड मेहनत करीत तिने सन २०१६ मध्ये रशिया येथे झालेल्या डेफ ऑलिंपिक स्पर्धेत ब्रांझ पथक पटकावले, कारण तिने तहानभूक विसरून पनवेल येथे माजी नेमबाज खेळाडू सिमा शिरूर हिच्या शूटिंग क्लबमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने पुण्याच्या बालेवाडी क्रिडा संकुलात नवनाथ परतवाडे आणि दिपाली देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले.
प्रसिद्ध नेमबाज खेळाडू अंजली भागवत यांनी तिला २०१३ मध्ये प्रशिक्षण दिले. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ भीष्मराज बाम सरांनी तिला संवाद साधण्यात अडचण असल्याने चित्र काढून प्रशिक्षण दिले होते. २०१६ मध्ये प्रियेशाने रशियात ऑलिंपिक कास्यपदक मिळविले, त्यानंतर प्रियेशा आणि तिची मैत्रीण धनुष यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण करीत यंदा सन २०२२ मध्ये ब्राझील येथे विशेष खेळाडूंसाठी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मिश्र दुहेरी दहा मीटर रायफल मध्ये नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे आणि आपल्या देशाचा राष्ट्रध्वज सुद्धा उंच फडकावला आहे. राज्यशासनाने तिच्या कामगिरीची योग्य दखल घ्यावी, हीच अपेक्षा आहे.