मात्र, अनेक ठिकाणी सकाळ सत्राचे शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याने येथील विद्यार्थी व शिक्षकांना सुट्टीचा फायदा झाला नाही. शिवाय त्यांना मुसळधार पावसात शाळा व महाविद्यालय गाठावे लागले. पहाटे पासूनच पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने थांबली होती. आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टी मध्ये सुधागड तालुक्यातील पाली अंबा नदीवरील पुलावरून दरवर्षी पाणी जाते. परंतु आता येथे नवीन पूल बांधून दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलांची उंची व रुंदी वाढवल्याने यंदा पावसाळ्यात वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अशी आशा होती. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते सखल भागात असल्याने तेथून व जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
त्यामुळे, प्रवासी व नागरिकांनी संताप व्यक्त केला. वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई गोवा महामार्गाला हा राज्य मार्ग जोडतो. मात्र येथील वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहू गाड्या, प्रवासी व दळणवळण आदिवर परिणाम होऊन वेळ व पैशांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले, शिवाय सखल भागात पाणी साठले, काही ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या संदर्भातील व्हिडीओ व फोटो तसेच प्रशासनाकडून आलेली माहिती अनेकांनी आपल्या स्टेट्सवर ठेवले होते.