आता रस्त्यावर थुंकण्यापूर्वी विचार करा

बुधवार, 2 जून 2021 (16:03 IST)
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 200 रुपये दंड घेतला जातो. पण हा दंड वाढवण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे 7 महिन्यात 14 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये 28 लाख 67 हजार 900 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
 
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती