खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने त्यांना बेस्ट आणि एसटीच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. कार्यालयात पोहोचण्यासाठी तासन्तास प्रवास करावा लागतो. त्यामुळे खासगी आणि सहकारी बँक कर्मचार्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार मंजुरीचे पत्र राज्याचे मुख्य आयुक्त संजय कुमार यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविले.त्यास रेल्वे बोर्डानेदेखील परवानगी दिली आहे.त्यानुसार खासगी आणि सहकारी बँकेमधील 10टक्के कर्मचार्यांनी राज्य सरकारकडून स्टेशन प्रवेशासाठी क्यूआर कोड घ्यावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जाणार असून अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.