आता गोदावरीच्या शंभर मीटर परिसरात ‘नो प्लॅस्टिक झोन’

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:40 IST)
शेजारील बाजारपेठेतून गोदावरी नदीकिनारा तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक येत असल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गोदावरी किनाऱ्यापासून १०० मीटरचा परिसर ‘नो प्लॅस्टिक झोन’ जाहीर केला असून त्याचा भंग करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात प्लॅस्टिकबंदीच्या नियमावलीनुसार पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना-२०१८ नुसार महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून शहरात प्लॅस्टिकबंदी लागू केली असली तरी त्याची अंमलबजावणी कागदोपत्रीच होत आहे.

प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची महापालिकेची आहे. बंदी जाहीर झाल्यानंतर जोमाने मोहीम राबवली गेली, मात्र कालांतराने अपुरे मनुष्यबळ व अन्य अडचणींमुळे मोहीम थंडावली आहे.
दरम्यान, गोदावरी परिसरात प्लॅस्टिक प्रदूषण वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ नुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिकबंदी व त्याच्या हाताळणीसंदर्भात अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती कारवाईसाठी सक्रिय झाली आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाढता प्लॅस्टिक वापर तसेच गोदावरी नदीतील प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही चर्चा करण्यात आली. त्यावर गोदावरी नदी परिसर व नदीकाठचा शंभर मीटरचा परिसर हा ‘नो प्लॅस्टिक झोन’ म्हणून जाहीर करून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी नदीकाठावर फलक लावणे तसेच पोलिसांची मदत घेऊन कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय झाला. बैठकीला पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक आवेश पलोड, निशिकांत पगारे यांच्यासह सहा विभागीय अधिकारी उपस्थित होते.
जनजागृतीसाठी फलक:
गोदावरी नदीकाठचा शंभर मीटरचा परिसर हा ‘नो प्लॅस्टिक झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला असून जनजागृतीसाठी नदीकाठावर फलक लावणे तसेच पोलिसांची मदत घेऊन कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती