एखाद दुसरा दिवस जाऊ द्यायचा, फेटा ठेवून द्यायचा : इंदुरीकर महाराज

शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (16:41 IST)
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादावर इंदुरीकर महाराजांनी रात्री केलेल्या किर्तनात भाष्य केल. “दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले. 
 
ते म्हणाले, “युट्युबवाले काड्या करतात. या यूट्यूब चैनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र चॅनल संपतील पण मी संपणार नाही. युट्युब आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागून मला संपवायला निघालेत. मी कशातही सापडेना म्हणून मला गुंतविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता तर मी या मुद्द्यावर आलोय, आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली. एखाद दुसरा दिवस जाऊ द्यायचा, फेटा ठेवून द्यायचा.”
 
“२६ वर्ष झाली कुटुंब सोडून रात्रंदिवस प्रवास, कष्ट, कष्ट, कष्ट करत लोकांसाठी फिरायचे. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादा वाक्य चुकीचे गेले असेल, मात्र मी बोललो ते चुकीचं नाही. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. तरीदेखील लोक म्हणतात, ‘याला पहिलं ठेवून द्या’. गेल्या तीन दिवसात माझं वजन अर्धा किलोने घटले. युट्युबवाल्यांना इंदुरीकर यांच्या नावानं मोक्कार पैसा मिळाला आहे. ही मंडळी कोट्याधीश झाली. मी या युट्युबकडून एक रुपयाही घेतला नाही”, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती