आरे कारशेडसाठी आता वृक्ष कत्तलींची गरज नाही, फडणवीसांचा दावा

सोमवार, 4 जुलै 2022 (07:44 IST)
एकनाथ शिंदेंच्या  बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. उद्धव ठाकरे  यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. यांनतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपचं सरकार येताच महाविकास आघाडीला धक्के द्यायला सुरुवात केली. फडणवीसांनी आरेतील मेट्रोच्या कारशेडला ग्रीन सिग्नल दिला. सत्तेच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. आरेतच मेट्रो कारशेड होणार असल्याने पर्यावरणवादी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तर मेट्रोला विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखं आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
आरेसंदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आहे तर, काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच तो प्रकल्प सुरू झाला. मेट्रो कारशेडसाठी झाडे कापलेली आहेत. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही. पुढच्या वर्षभरात काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती