मुंबईत चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारी भागामध्ये वादळी पाऊस आणि त्यानंतर काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतला एक व्हिडिओ शेअर करून थेट पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चक्रीवादळानंतरचा वरळीमधला एक व्हिडिओ निलेश राणे यांनी ट्वीट केला असून त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
या व्हिडिओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असल्याचं दिसत आहे. चिंचोळ्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होत. आहे. पावसाळ्यामध्ये मुंबईत साचणारं पाणी, तुंबणारे नाले आणि लोकांची होणारी ससेहोलपट हे चित्र दरवर्षी दिसत आहे.
“हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही”, अशा शब्दांत निलेश राणेंना आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.