काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल दीड वर्षे रत्नागिरीत काँग्रेस जिल्हाध्यक्षाची नियुक्तीच झाली नसल्याच्या मुद्यावरुन राणे यांनी चव्हाण यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना निलेश राणे यांनी दिलेला पदाचा राजीनामा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले आहे. त्यानंतर झालेल्या नगर परिषद तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे गेलेल्या काँग्रेसकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. जिल्ह्यातील पाच तालुक्यात निलेश राणे यांनी तर चार तालुक्यात भाई जगताप यांनी उमेदवार निवडीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीबाबत झालेल्या दिरंगाईबाबत तीव्र शब्दात आपली मते व्यक्त केली आहेत.