यंदा 5 ग्रहणे, 3 गुरुपुष्य योग आणि एकच अंगारकी चतुर्थी

नवीन वर्षात 5 ग्रहणे, 3 गुरुपुष्य योग आणि एकच अंगारकी चतुर्थी आहे. नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणार असल्याने दिवाळी फक्‍त चारच दिवस येणार आहे अशी नववर्षाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोण यांनी दिली आहे.
 
नववर्ष हे ‘लीप’ वर्ष नसल्याने हे वर्ष 365 दिवसांचेच असणार आहे. 2019 या नूतन वर्षात 3 सूर्यग्रहणे व 2 चंद्रग्रहणे अशी एकूण 5 ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी 16 जुलैचे खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. मुंबईतून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. 85 टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2010 चे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. 11 नोव्हेंबर रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. 21 जानेवारी व 19 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ईद-ए- मिलाद या तीनच सुट्ट्या रविवारी आहेत. या नूतन वर्षी वसुबारस व धनत्रयोदशी एकाच दिवशी 25 ऑक्टोबर रोजी येत आहेत. 27 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन येत सून, 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा व 29 आक्टोबर रोजी भाऊबीज येत असल्याने दिवाळी चारच दिवस असणार आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.
 
ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर हे तीन महिने वगळता इतर 9 महिने विवाह मुहूर्त आहेत. सोने खरेदी करणार्‍यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या नूतन वर्षी 6 जून, 4 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी गुरुपुष्य योग आहेत. या वर्षी 17 सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती