राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर

रविवार, 10 एप्रिल 2022 (12:05 IST)
राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार 10 एप्रिल रोजी अमरावती दौऱ्यावर आहेत. या दिवशी ते स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दुपारी 3 वाजता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. 
 
विभागातील पाच जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मंत्री, आमदार, माजी आमदार, प्रदेश अधिकारी, जिल्हा निरीक्षक, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत आणि संघटना मजबूत करणार आहेत. 
 
या मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते तथा विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी पाचही जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. पवार आणि पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे होणाऱ्या संवाद बैठकीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. या नंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे.त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 350 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या वेळी सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी करण्यात आली आहे. 
 
शरद पवार यांच्याहस्ते आज शिवाजी संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे उदघाटन होणार आहे. अमरावती शहरात त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ पोस्टर लावण्यात आले आहे. आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती