नाशिकचे तापमान 39.2 डिग्री सेल्सिअस, हंगामातील सगळ्यात जास्त तापमान

सोमवार, 17 एप्रिल 2023 (21:27 IST)
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा  कहर सुरु  आहे. तर दुसरीकडे  उन्हाचा तडाखा देखील बसू लागला आहे. त्यामुळे ऊन आणि अवकाळी पाऊस दोघांचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे. नाशिकमधील तापमान  हे चाळीशीच्या आसपास येऊन ठेपले आहे. वाढत्या उन्हामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होऊन नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. नाशिक शहरात रविवारी 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर सोमवारी नाशिकचे तापमान 39.2 डिग्री सेल्सिअस म्हणजे या हंगामातील सगळ्यात जास्त तापमान नोंदविले गेले आहे. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे. 
 
जिल्ह्यात एकी कडे अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसरीकडे तापमापनात वाढ होत आहे. या सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. अगदी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी नाशिक चे तापमान 39.2 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. बुधवारी 37.8 अंश सेल्सिअस, गुरुवार 37.8 अंश सेल्सिअस, शुक्रवार 38.1 अंश सेल्सिअस, शनिवार 38.2 अंश सेल्सिअस, रविवार 37.3 अंश सेल्सिअस असं तापमान राहिलं आहे.  त्यामुळे यंदा नाशिकरांना एप्रिलपासूनच उन्हाच्या तीव्र  झळा बसू लागल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच मे महिन्यात उन्हाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती