नाशिक मागील अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान,अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात गेली आहे. रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे.अनेकांच्या घरात पाणी घुसलं असल्यानं नाशिक महापालिकेचा नाले सफाईच्या दाव्यातील फोलपणा चव्हाट्यावर आलाय. तर गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या २४ तासात १३ टक्के वाढ झाली.
राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून पावसाने पाठ फिरविली होती. परंतु मागील गेल्या तीन चार दिवसापासून पावासने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
नाशिककरांना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे. २४ तासांत गंगापूर धरण क्षेत्रात २३४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 49.71 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या 24 तासात 13 टक्के वाढ झाली. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरु राहिला तर नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होऊ शकतं. नाशिकमध्ये पाणी कपात सुरु करण्यात आली आहे.