नाशिक : छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन नाशिक येथे करण्यात आले. त्यावेळी बोल ना लेखकांना लेखक म्हणून पुढे आणण्याचे काम प्रकाशक करतात. अख्खं जग आपल्याला पुस्तकात सापडते. हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा अतिशय महत्वाचा दुवा असून पुस्तकं ही समाज घडवण्याचे अतिशय मौलिक काम करतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
तर यावेळी पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “प्रभू रामचंद्र यांच्यामुळे जशी नाशिकची भूमी प्रसिद्ध आहे. तशी ही भूमी ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. विद्वान, लेखक, विचारवंत यांची परंपरा नाशिक शहराला लाभली असून कुसुमाग्रज, कानेटकरांनी मराठी साहित्य विश्वाला वेगळ्या उंचीवर नेले असे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्यातून समाजाची सत्य परिस्थितीत समाजासमोर येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचाल तर वाचाल असं म्हटलं आहे. ते अतिशय खरं असून वाचन करणं अतिशय महत्त्वाचे आहे. महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात समाजाच्या विरुद्ध जाणारी जी मत धाडसीपणे मांडली ती गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीयरत्न या सारख्या पुस्तकांतून पुढे आली. सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके आणि साहित्य सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी बोलताना भुजबळांनी जेल मधील किस्सा सांगितला. त्यावेळच्या मायबाप सरकारमुळे अडीच वर्ष जेलमध्ये होतो. आता जेल म्हटलं की सामान्य जनतेत एक वेगळी भावना असते. मात्र त्या अडीच वर्षात हरएक पुस्तक वाचून काढले. माझ्या सुनबाई नेहमीच अनेक पुस्तके आणून देत. त्यामुळे अडीच वर्ष अनेक पुस्तके वाचली. त्यामुळे या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडलो, एकूणच मला पुस्तकांनी वाचवल्याचे छगन भुजबळांनी सांगितले.
आज पुस्तके ऑडिओ स्वरुपात देखील उपलब्ध झाली आहे. रोज या ऑडिओ बुक आपण दैनंदिन ऐकत असून पुस्तकांचं बदललेल्या या स्वरुपामुळे प्रिंटिंग पुस्तकांचं काय होईल असा प्रश्न पडतो. परंतु जसे टीव्ही माध्यमे विकसित झाली तेव्हा वर्तमानपत्रांचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वर्तमानपत्रांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तसेच स्थान पुस्तकही कायम ठेवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपर्यंत तीन वेळा नाशिकला झालेले आहे. नुकत्याच सन 2021 साली झालेल्या भव्य दिव्य साहित्य संमेलनाचा नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याची आठवणही त्यांनी यावेळी उपस्थितांना करुन दिली.