नाशिक : 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास 20 वर्षे सश्रम कारावास

शनिवार, 6 एप्रिल 2024 (09:35 IST)
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 10 ते 14 जुलै 2023 दरम्यान पंचवटीतील पाथरवट लेनमध्ये आरोपी प्रकाश आबासाहेब ठोंबरे (वय 43, रा. पाथरवट लेन, पंचवटी) याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीस त्याच्या घरात बोलावून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ठोंबरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कर्पे यांनी केला असून, त्यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून अतिशय चिकाटीने तपास केला व ठोंबरेविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 5, नाशिक येथे सुरू होती.

श्रीमती पी. व्ही. घुले यांनी आरोपीविरुद्ध असलेल्या पुराव्यांवरून त्याला 20 वर्षे सश्रम कारावास, 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती लीना चव्हाण यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार एम. एम. पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. शिंदे यांनी वेळोवेळी शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती