नंदुरबार : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री. गणेशाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. कारखान्यांमध्येही मूर्ती तयार करणे रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. गणपती बनवताना लागणारा कच्चा माल, कारागिरांच्या मानधनात वाढ, रंग, काथ्या, दाग-दागिन्यांची सजावट तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस या साहित्यात महागले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच गोष्टीत महागाई झाल्याने मूर्तींच्या किमतीतही ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तर गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरले जाते. गणेशमूर्ती आकर्षक रंगवण्यासाठी पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. गणेश मूर्तीमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सावकार, टिटवाळ्याचा गणपती असे विविध आकर्षक डिझाईनचे गणपती बनविण्यात येत आहेत.
पेननंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मुर्ती जात असतात. कोरोना काळातीळ निर्बंध व गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादेमुळे मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते. यावर्षी सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्याने गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे.
नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे १०० कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेले आहेत. सात इंचापासून तर २२ फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत.
गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. तर ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तींना परदेशात मॉरीशिअस, थायलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप सारख्या अनेक देशात मागणी असल्याने दरवर्षी २५ ते ३० हजार गणेशमूर्ती रवाना करण्यात येतात. गणेशमूर्तींच्या दरात वाढ झाली असताना भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.