कोकणातील नाणार येथील तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प अन्यत्र हलविण्याची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेने या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केला होता. भाजप आणि शिवसेना यांनी युती करण्याची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचा आणि स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प आता अन्यत्र हलविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले.
तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही. पण हा प्रकल्प ज्या ठिकाणी स्थानिकांचा विरोध नाही, त्या ठिकाणी व्हावा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. नाणारमध्ये स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे तेथील जमीन अधिग्रहणाचे काम राज्य सरकारने याआधीच थांबवले आहे. आता स्थानिकांच्या मागणीचा विचार करून हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येईल. ज्या ठिकाणी स्थानिकांचा विरोध नाही. तिथे हा प्रकल्प नेण्यात येईल. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच सरकार हा प्रकल्प अन्यत्र उभारेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.