कापरी (ता. शिराळा) येथे पैशाच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी अकराच्या सुमारास घडली. यामध्ये महेश राजेंद्र मोरे (वय 27) याचा जाग्यावर मृत्यू झाला. तर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय 22) हा बेपत्ता झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, मयत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे, मुळगाव हालोंडी (ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) सध्या रा. कापरी (ता. शिराळा) हे आईसह लहानपणापासून आजोळी मामा व आजीकडे रहात आहेत. तर वडिल राजेंद्र हे गावाकडेच असतात. महेशचे ल ग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. मयत महेश व अविनाश दोघांमध्ये पैसे देवघेवी वरून भांडणे होत होती. दोघे दररोज सेट्रिंगवर कामावर जात होते. परंतु मयत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वाद होत. तर पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे काढत होता, याच कारणावरून शानिवारी रात्री अविनाशचे आई व भावाबरोबर भांडण लागले. यावेळी ते घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर आले. येथे आल्यावर यावेळी संशयित आरोपी अविनाशने लाकडी दांडके महेशच्या डोक्यात घातले यामध्ये महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला.