मुंबईसह कोकण, पुणे, कोल्हापूरात जोरदार पाऊस

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (17:26 IST)

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  दुपारी 2 च्या सुमारास अंधारून आल्यावर येऊन पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला. तसंच कांदिवली, बोरीवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. तसंच विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. साकीनाका भागातही पावसाने हजेरी लावली असून पवई, कांजूरमार्ग भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. 

मुंबईसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आल्यानं माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.  तर  पुणे शहर व परिसरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सात  स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत. 12 हजार 196 क्यूसेक प्रति सेकंद  पाणी भोगावती पात्रात पडत असल्याने संध्याकाळ पर्यंत कोल्हापुर पद्धतीचे  बंधारे पाण्याखाली जाऊन अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामस्थाना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती