अनधिकृत बांधकामप्रकरणी नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक दाखल
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (11:15 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना दाखल झाले आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे.
नारायण राणे यांनी शनिवारी (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.
या इमारतीचे आर्किटेक्ट हे नामांकित आहेत. 13-14 वर्षे बांधकामाला झाली आहेत. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नसल्याचं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.
"नियमानुसार बांधकाम करून आम्हाला ताबा देण्यात आला. मनापानं सर्व मंजुरी दिलेल्या आहेत. 100 टक्के कायदेशीर काम केलं आहे," असं राणेंनी म्हटलं.
"आम्ही घरात केवळ 8 जणं राहतो. त्यामुळं अधिक बांधकाम करण्याची गरजच पडलेली नाही. ही निवासी इमारत आहे. व्यावसायिक वापर नाही. पण शिवसेना आणि मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार मुद्दाम करायला लावण्यात आली," असंही राणेंनी म्हटलं आहे.