राज्यात “या” ठिकाणी गोवरचे सर्वाधिक रुग्ण; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली माहिती

बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (08:15 IST)
मुंबई : येथे गोवरचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव हा लगतच्या ठाणे जिल्ह्यासह  भिवंडीत दिसून आला आहे. यानंतर आता नाशिक जिल्ह्यामधील मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण आढळले आहेत. आता नाशिक शहरात देखील गोवर संशयित आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील गोवरचा वाढाता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून काम करत आहेत. तसेच केंद्र सरकार बालकांच्या लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली होती.
 
दरम्यान, मुंबई, भिवंडी, मालेगाव हे महाराष्ट्रातले 3 हॉटस्पॉट ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची तातडीने दखल घेतल रुग्णालयामध्ये भेट देऊन माहिती घेतली आहे. त्या अनुषंगाने आजही आढावा बैठक घेतली होती. सध्या राज्यामध्ये ६२ संशयित रुग्ण आहेत. गोवरची साथ नियंत्रणात आहे. गोवर यापुढे भविष्यात उद्भवणारच नाही, याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली आहे. ज्या मुलांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे, त्यांचे लसीकरण झालेले नव्हते, असे मंत्री सावंत यांनी सांगितले आहे. या आजाराबाबत चौकशी केली असता असे आढळून आले की, शून्य ते ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये हा संसर्ग अधिक आहे.
 
आतापर्यंत २० लाख नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. संशयित रुग्ण शोधून, देखरेख ठेवणे आणि तातडीने उपचार उपलब्ध करण्यात देण्यात येत आहे. यामुळे गोवरची साथ राज्यामध्ये सध्या नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. लसीचा पुरवठा प्रचंड आहे, असेही मंत्री सावंत यांनी सांगितले आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे केंद्र सरकार बालकांची लसीकरणाची वयोमर्यादा 3 महिन्यांनी कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या गोवरची लस ही 9 महिन्यांच्या बालकाला दिली जाते. आता त्यामध्ये 3 महिने कमी केल्यास 6 महिन्यांच्या बालकांना देखील लस देण्याचा विचार केला जात आहे.
 
गोवरचा संसर्ग हा शून्य ते 9 महिन्यांच्या आतील बालकांना होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे या बालकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. गोवरचा उद्रेक हा मुंबईत गोवंडीमध्ये ठाणे जिल्ह्यात भिवंडीत आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे.
 
मुंबई आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारचे आरोग्य पथक देखील मुंबईत येऊन गेले. दाट लोकवस्ती, कुपोषण, लहान घरात मुलांची अधिक संख्या, लसीकरणाबाबत उदासीनता, अशा कारणामुळे गोवरचा संसर्ग वाढत असल्याचं डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती